कालच्या पावसाने जसे पावसाळी गटारांना बुडवून टाकले तसेच वाहतुकीचे पण १२ वाजले. अनेक चौकातून पाणी साठले होते. पाण्याचा प्रवाह इतका होतो कि उभी केलेली दुचाकी वाहने पडत होती. वाहतूक नियंत्रक दिवे तर बंदच होते.
मी राहतो तिथे म्हणजे कोथरूड शिवाजी पुतळ्याच्या इथे भरपूर पाणी रस्त्यावरून वाहत होते. ऑफिस मधून कसातरी घरी आलो, सगळे सामान ठेऊन खाली उतरलो (हि माझी जुनी सवय आहे, वाहतूक कोंडीच्या वेळेस जर आपल्याला जमत असेल तर तिथे जाऊन वाहतूक नियमन करावे). कर्वे पुतळ्याच्या चौकात गेलो तिथे काही तरुण मंडळी नियमन करण्याच्या कामात झटत होती (वाहतूक पोलीस कुठे दिसत नव्हते). मी पण त्याच्यात सामील झालो. वाहतूक नियमन करताना बरेच वेगळे अनुभव येतात बरेचसे लोक धन्यवाद म्हणतात आणि काही तर चिडून शिव्या पण देत होते आणि काही महान लोक होर्न वाजून त्रास देत होती.
कालचे काही अनुभव
आम्ही जेव्हा एका बाजूचा रस्ता थांबवला होता तेंव्हा तेथून एक मुलगा त्याची गाडी घेऊन रस्ता ओलांडायचा प्रयत्न करत होता, त्याला जेंव्हा थांब म्हणून सांगितले तर आमच्याच अंगावर ओरडत होता कि आमची गाडी नेहमी पलीकडे लावलेली असते. त्याने वाहतूक पोलिसांना जसे रेनकोट दिले आहेत तसा घातला होता, काही करून ऐकताच नव्हता, थोड्या वेळाने जशी जागा मिळाली तसा तो पलीकडे गेला. नंतर तो पण नियमन करू लागला आणि आलेल्या वाहतूक पोलिसांशी बोलत होता. हा काय प्रकार आहे? तो मुलगा वाहतूक पोलिसात होता का ? जर कोणी नियमन करत असेल तर पोलिसांनी मदत करणे गरजेचे नाही का?
गाडी चालवणारे लोक पण काही मजेशीर असतात. जीथे वाहतूक कोंडी झाली तिथेच त्यांना कुणालातरी उतरवायचे असते किंवा घ्यायचे असते अरे इतके कळत का नाही ? काही लोक मोबाईल वर बोलत गाडी चालवत असतात, आता एक तर कोंडी त्यात हे असे हळू हळू गाडी चालवणार कसे काय होणार?
रस्त्याच्या एका बाजूला खूप पाणी होते जिथून दुचाकी वाहने जाऊ शकणार नाहीत, आणि सगळ्या वाहनांना दुसऱ्या बाजूनेच जायचे होते अगदी मोठ्या मोठ्या बसेस ना पण, हे असे का?
एक काका तर गाडी बंद पडली म्हणून रस्त्यात गाडी लावून गेले, आणि नेमके दुसऱ्या बाजूला पाणी साठले होते म्हणजे झालेच वाहतूक कोंडी ची सुरुवात.
असे आपल्याकडचे रस्त्यावरती केलेले प्रयोग फसत जाणार आणि आपण रस्त्यात अडकणार वेगळे काही नाही ........................
आता पुन्हा पाउस येणार
आकाश काळे निळं होणार
मग रस्त्यावरून नदी वाहणार
मग वीज कुठेच नसणार
मग वाहतूक कोंडी होणार
काय रे देवा ....